पिंपरी : थरमॅक्स चौकातील ICICI बँकेचे ATM मशीनच नेले चोरून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात काही महिन्यांपासून एटीएम चोरीच्या घटना थांबल्या होत्या. मात्र सोमवारी मध्यरात्री थरमॅक्स चौकातील धनश्री हॉस्पिटल शेजारी असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिनच चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या मशीन मध्ये पाच लाख 71 हजार एवढी रक्कम असल्याचे पोलिसांनी सांगितले. भर रस्त्यावरील एटीएम सेंटर चोरुन नेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

थरमॅक्स चौकातील एटीएम मशीनला दोरी बांधून ती बलोरो गाडीला बांधून, गाडीने ओढून संपूर्ण मशीनच चोरून नेले आहे. यामध्ये पाच लाख 71 हजार रुपये रक्कम होती. कोरोना व्हायरसमुळे झालेले लॉक डाऊन जस जसे शिथिल होत आहे तस तसे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम मशीन चोरुन नेल्याच्या, फोडल्याच्या याही पूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. पैकी काही गुन्हे उघडकीस आले आहे.

थरमॅक्स चौकात ज्या पद्धतीने एटीएम मशीन चोरुन नेले आहे. त्याच पध्द्तीने चाकण येथे पूर्वी मशीन चोरून नेलव होते. या गुन्ह्याच्या अद्याप तपास लागलेला नाही. शहरातील मध्यवर्ती आणि रस्त्यावर असणाऱ्या एटीएम सेंटर चोरून नेल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपास सुरु आहे. तपास निगडी पोलीस करत आहेत.