Pimpri : चिंचवड अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण, ‘मीच माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले’ तरुणीचा कोर्टात कबुली जबाब

चिंचवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चिंचवड येथे एका कार्यालयात काम करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही तासात तरुणीची सुटका करुन आरोपी तरुणाला अटक केली. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय वळण आले आहे. अपहरण झालेल्या मुलीने न्यायालयात ते अपहरण नाही, मी माझ्याच मर्जीने तरुणासोबत गेल्याचे शपथपत्र न्यायालयात सादर केले आहे.

याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या मुलीचे अपहरण मंगळवारी (दि.19) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ती काम करत असलेल्या कार्यालयातून करण्यात आले, अशी फिर्याद तीच्या वडिलांनी दिली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाला अटक केली.

तरुणाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी तरुणी देखील न्यायालयात हजर झाली. तीने स्वत: न्यायलयात शपथपत्र दिले. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, माझे अपहरण झाले नसून मी माझ्या मर्जीने त्या तरुणासोबत गेले. तरुणासोबत आपले प्रेमसंबंध असून त्याला तरुणाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे तिने तरुणाला ऑफिसमध्ये बोलावून घेत त्याच्यासोबत गेली, असे शपथपत्रात म्हटले आहे.

मुलीने वडिलांनी दिलेली फिर्याद खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच तो बाहेर आल्यानंतर आम्ही लग्न करणार असल्याचे देखील तरुणीने सांगितले. तरुणीच्या या शपथपत्रामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुण मुलीला पिस्तूलाचा धाक दाखवून नेत असल्याचे दिसत आहे. मात्र, आता तरुणीने घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.