Pimpri News : महिला अधिकाऱ्यासोबतचे ‘लव्ह मॅटर’ पडले महागात, 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्याच्या प्रेमसंबंधातून दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर मद्यपान करुन व्हॅन चालवल्याचा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अनिल संपत निरवणे या पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निरवणे याने महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकरणी तब्बल 18 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. इतक्या उशीरा गुन्हा दाखल करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कंबरेला दुखापत झाली असून त्याच्या जीवाला धोका नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संदीप आबासाहेब खांबट या कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने मद्य प्राशन करुन पोलीस व्हॅन चालवली. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.