Pimpri News : वाहतूक शाखेने बोलावलेल्या बैठकीवर रिक्षाचालकांनी घातला बहिष्कार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या प्रश्नावरती पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेच्या वतीने चिंचवड येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित केली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र साडेबारा पर्यंत देखील बैठक सुरु झाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करत बैठकीवर बहिष्कार टाकला.

रिक्षा चालक ताटकळत थांबले, रिक्षा व्यवसाय बुडवून आम्हाला बोलावले आणि आम्हाला ताटकळत थांबावे लागले, दीड तास थांबून देखील मीटिंग सुरू झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सर्व रिक्षा चालक मालकांनी आणि रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी निषेध करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन बैठकीवर बहिष्कार टाकला आणि घोषणा देत सर्व रिक्षाचालक-मालक बैठकीतून निघून गेले.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख, रिक्षा पंचायतचे अशोक मिर्गे, आत्माराम नाणेकर, रिक्षा महासंघाचे बाबा चव्हाण, राम बनसोडे, विष्णू लोंढे, फिरोज पाटील आदी उपस्थित होते.

मंगळवार (दि.29) सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखेमध्ये विविध रिक्षा संघटनेकडून त्यांच्या समस्या बाबत अर्ज प्राप्त होते. त्या अनुषंगाने फक्त रिक्षा संघटना सबंधित पदाधिकारी यांना बोलविले होते. चाकण, देहूरोड येथील पदाधिकारी यांची बैठक शांततेत पार पडली. बैठकीत कोणत्याही रिक्षा चालकांना बैठकीस बोलविले नव्हते, असे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी सांगितले.