पिंपरी : वृद्ध महिलेला लुटणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  – निगडी परिसरात घरात असलेल्या वृद्ध मालकीनेचा गैरफायदा घेत केअर टेकर असणाऱ्या नोकराने मित्राच्या मदतीने मारहाण करुन सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला. निगडी पोलिसांनी दोन महिन्यानंतर या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरीचा माल असा 1 लाख 24 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.

दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे (20, रा. कल्पना सोसायटी, तळेगाव दाभाडे) आणि संदीप उर्फ गुरु भगवान हांडे (24, रा. चिंचवडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका केअर टेकर सेंटरमध्ये दोन्ही आरोपींची एकमेकांशी ओळख झाली. दीपक हा दोन महिन्यांपूर्वी संबंधित ज्येष्ठ महिलेच्या घरी केअर टेकर म्हणून कामाला होता. त्यानुसार घरातील सर्व साहित्य व वेळेची माहिती त्याने घेतली. जून महिन्यात त्याने संबंधित महिलेच्या घरचे काम सोडले.

संबंधित महिला घरी एकटी असते व घरात मौल्यवान वस्तू कुठे आहेत ते त्याने हेरले होते. 10 ऑगस्टला रात्री दोघेजण घराशेजारील उद्यानाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून ज्येष्ठ महिलेच्या घरात आले. महिलेला चाकूचा धाक दाखवून तसेच हातावर काठीने मारहाण करत त्या दोघांनी 4 लाख 30 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

तपास पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक सतिश ढोले यांना दीपक याने तेथे काम केल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यातील आरोपी थरमॅक्‍स चौक येथे चोरीचा माल विक्रीला घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे विचारपूस केली असता, सुगावे याने तळेगाव येथे लपून ठेवलेले साहित्य व इतर वस्तू पोलिसांना काढून दिल्या. तसेच, त्या गुन्हयात वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त स्मिता पाटील, सहायक आयुक्‍त राम जाधव,यांच्या मार्गदर्शनाखली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, विजय बोडके, दीपक जाधवर, सोपान बोधवड आणि राजेंद्र जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.