सरकारी दिरंगाईचं उत्तम उदाहरण, पती शहीद झाल्यानंतर तब्बल 69 वर्षांनी मिळाली पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेला पतीच्या मृत्यूनंतर तब्बल ६९ वर्षांनी त्याच्या नावाने पेन्शन मिळाले आहे. परुली देवी असं या महिलेचं नाव असून त्यांचे पती हे भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. गगन सिंह हे शहीद झाले होते. गगन सिंह १९५२ साली कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते. मात्र परुली देवी यांना पतीनंतर मिळणारे पेन्शन मिळायला २०२१ सालाची वाट पाहावी लागली आहे. ही घटना पाहता सरकारी व्यवस्थेच्या दिरंगाईचा अनेकदा सर्वांनाच फटका बसतो हे लक्षात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, परुली देवी यांचा विवाह लोहाकोट येथील सैनिक गगन सिंह यांच्याशी १० मार्च १९५१ रोजी झाला होता. दुर्दैवाने लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १४ मे १९५२ रोजी गगन सिंह यांचा कर्तव्य बजावत असताना गोळी लागून मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर परुली देवी यांनी काही काळ सासरीच राहिल्या. त्यानंतर त्या त्यांच्या माहेरी परतल्या. यानंतर पुन्हा त्या सासरी परतल्या नाहीत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माहेरीच घालवलं.

परुली देवी यांच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी त्यांचे पालनपोषण केले. पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. तसेच भारतीय सैन्यदलाने देखील याची दखल घेतली नाही. अखेरीस अनेकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी निवृत्त अधिकारी डी एस भंडारी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि सुमारे ६९ वर्षांनंतर परुली देवी यांना पेन्शन मिळाली आहे.

प्रयागराजहून आता परुली देवीयांना कौटुंबिक पेन्शन देण्यास संमती देण्यात आली आहे. निवृत्त अधिकारी डी एस भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परुली देवी यांना १९७७ पासून ४४ वर्षांच्या पेन्शनचा एरियस सुमारे २० लाख रुपयांपर्यंत मिळेल. आपल्या माहेरच्यांनी आपला इतके वर्ष सांभाळ केला. आपल्याला काहीही कमी पडू दिले नाही, त्यामुळे या पैशांवर खरा हक्क त्यांचाच असल्याचं परुली देवी यांनी म्हटलं आहे. परुली देवी यांच्या भावाचा मुलगा प्रवीण लुंठी यांना आत्याला ६९ वर्षांनी पेन्शन मिळणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे.