‘मन की बात’ मध्ये PM मोदींचा ‘युथ’वर ‘फोकस’, ‘घराणेशाही’वर ‘निशाणा’, वाचा 10 महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मधून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी देशातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पीएम मोदी म्हणाले, नवीन वर्ष आणि नव्या दशकासाठी आपण संकल्प केला पाहिजे. तसेच पीएम मोदींनी स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. आपल्या 60 व्या मन की बातमध्ये मोदींनी केलेली 10 मोठी वक्तव्य जाणून घेवूयात.

काय म्हणाले मोदी…

1) मागील सहा महिन्यांत 17 व्या लोकसभेची दोन्ही सभागृहे खुप कार्यक्षम होती. लोकसभेने 114 टक्के काम केले, तर राज्यसभेने 94 टक्के काम केले. मी दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व खासदारांना त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल शुभेच्छा देतो.

2) इस्त्रोजवळ अ‍ॅस्ट्रॉसॅट नावाचे एक अ‍ॅस्ट्रॉनॉमिक सॅटेलाइट आहे. सूर्यावर संशोधन करण्यासाठी इस्त्रो आदित्य नावाचे दुसरे सॅटेलाइटही लवकरच तयार करत आहे. खगोलशात्रातील आपले प्राचीन ज्ञान असो की आधुनिक, ते आपल्याला जाणून घेतले पाहिजे.

3) आपल्यासाठी हे महत्वाचे आहे की, देशातील नागरिक स्वयंपूर्ण व्हावेत, आणि त्यांनी सन्मानाने आपले जीवन जगावे. मी येथे जम्मू-काश्मीरच्या हिमायत उपक्रमावर चर्चा करू इच्छितो. हिमायत कार्यक्रम हा स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगाराशी संबंधीत आहे.

4) तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, हिमायत कार्यक्रमांतर्गत मागील 2 वर्षात 18 हजार युवकांना विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले गेले आहे. यातील सुमारे 5 हजार लोक विविध ठिकाणी काम करत आहेत. तसेच अनेकजण स्वयंरोजगारात वाटचाल करत आहेत.

5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले की, 2022 मध्ये देशातील लोकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर जोर द्यावा. पीएम म्हणाले, पण हे सरकारी काम असू नये. देशातील युवकांनी छोटे-छोटे गट आणि संघटना करून लोकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करावे.

6) मला विश्वास आहे की, भारतात हे दशक केवळ युवकांच्या विकासासाठी नव्हे, तर युवकांच्या सामर्थ्याने देशाचा विकास करणारेही असावे. भारताला आधुनिक करण्यासाठी युवकांची मोठी भूमिका असणे गरजेचे आहे.

7) शिक्षण घेतले जाते, शिक्षण घेतल्यानंतर माजी विद्यार्थांच्या भेटीचा कार्यक्रम खुप कुतूहलयुक्त असतो. मोदी म्हणाले, हा कार्यक्रम जुन्या मित्रांना भेटण्यासाठी असतो आणि जर या कार्यक्रमासोबत एखादा संकल्प केला तर तो अधिक चांगला होऊ शकतो.

8) पंतप्रधान मोदी यांनी युवकांचे आदर्श असलेल्या स्वामी विवेकानद यांचा उल्लेख करून म्हटले की, स्वामी विवेकानंद म्हणत, युवावस्थेची किंमत होऊ शकत नाही. हा जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड असतो. मोदी म्हणाले, तुम्ही तुमच्या तरूणावस्थेचा कसा उपयोग करता, यावर तुमचे जीवन अवलंबून असते.

9) पीएम मोदी म्हणाले, देशातील तरूणांना अराजकाता, अस्थिरता आणि जातीयवादाबाबत चीड आहे. सध्याचा तरूणवर्ग जाती-पातीच्या पलिकडे विचार करतो.

10) 2019 ला निरोप देण्यासाठी काही क्षण आपल्या समोर आहेत. आता आपण केवळ नव्या वर्षात पदार्पण करणार नाही तर, नव्या दशकातही प्रवेश करणार आहोत. यात जे देशाच्या विकासाला चालना देण्याची सक्रिय भूमिका करणार आहेत, त्यांचा जन्म 21 व्या शतकात झालेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/