देव आमच्या पाठीशी, असुरांचा नाश अटळ

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे तर भारातात उत्साहाचे वातावरण आहे. या जोल्लोशाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या एका कार्यक्रमात आपल्या भाषणातून पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. मानवतेच्या शत्रूंपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी देवाचं पाठबळ नेहमी आमच्यासोबत राहतं. हाच संदेश आम्ही पूर्ण प्रामाणिकतेने असुरांना देण्याचा प्रयत्न करत आहोत असं मोदी म्हणाले.

इस्कॉन मंदिरात झालेल्या कार्य़क्रमामध्ये नरेंद्र मोदी येताच उपस्थितांनी ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. काहींनी उभं राहून पंतप्रधानांना अभिवादन केलं. यानंतर पंतप्रधानांनी ‘हरे कृष्ण-हरे कृष्ण’ म्हणत सर्वांना शांत केलं. भगवद् गीतेसारखा उत्कृष्ट ग्रंथ मला राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली. २० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी याच मंदिराचं उद्घाटन केलं, असं ते म्हणाले.

नरेंद्र मोदींनी आज जगातल्या सर्वाधिक मोठ्या गीतेचे अनावरण केले. या गीतेची लांबी बारा फूट तर रुंदी नऊ फूट असून वजन ८०० किलो आहे. ‘श्रीमद्गभगवतगीता भारताने जगाला दिलेली प्रेरक भेट आहे. गीता धर्मग्रंथ आहेच पण जीवनग्रंथही आहे. आपण कोणत्याही देशाचे नागरिक असलो, कोणताही धर्म मानणारे असलो तरी आपल्याला रोज समस्यांनी घेरलेलं असतं. अनेकदा अर्जुनासारखी द्विधा अवस्था होते तेव्हा गीताच आपल्याला सेवा आणि त्यागाच्या मार्गाने या समस्यांवरील उपाय दाखवते,’ अशा शब्दात मोदींनी गीतेचं सार सांगितलं.