काय सांगता ! होय, योगींच्या युपीत PM मोदींचे भाऊ लखनऊ एअरपोर्टवरच बसले आंदोलनास, दिली ‘ही’ धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लखनऊ पोलिसांच्या कार्यशैलीने नाराज होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी राजधानी लखनऊमधील अमौसी विमानतळावर धरणे आंदोलनाला बसले आहेत. वास्तविक, प्रल्हाद मोदी आपल्या खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशात आले आहेत, परंतु विमानतळावर जे लोक त्यांना रिसिव्ह करण्यासाठी दाखल होणार होते, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याचा राग धरून प्रल्हाद मोदी विमानतळावरच ठिय्या मांडून बसले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

दुसरीकडे, प्रल्हाद मोदी म्हणतात की ज्या आधारे आमच्या लोकांना अटक केली गेली आहे त्या आदेशाची एक प्रतही मला देण्यात यावी, तसेच प्रल्हाद मोदी असेही म्हणतात की जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते अन्न पाण्याचा त्याग करून धरणे आंदोलनाला बसून राहतील.

प्रल्हाद मोदी म्हणाले, “आमच्या सर्व समर्थकांना जोपर्यंत सोडण्यात येत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसेल. कोणाच्या आदेशानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले याचे उत्तर लखनऊ पोलिसांनी द्यावे. जर पीएमओचा आदेश असेल तर तो आदेश दाखविण्यात यावा.”

प्रल्हाद मोदी म्हणतात की मला 4 फेब्रुवारीला सुलतानपूर, 5 ला जौनपूर आणि 6 फेब्रुवारीला प्रतापगडला जायचे होते. म्हणूनच आज मी लखनऊ विमानतळावर आलो आहे. येथे आल्यानंतर मला कळले की आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले. म्हणून आज मी धरणे आंदोलनाला बसलो आहे. विमानतळाबाहेर तोपर्यंत धरणे देऊन बसून राहील जोपर्यंत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सोडले जात नाही.