2015 पासून आतापर्यंत PM मोदींनी केला 58 देशांमध्ये प्रवास, झालेल्या खर्चाबाबत परराष्ट्र मंत्रालयानं दिली माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात संसदेचे पावसाळी अधिवेशन चालूच आहे. राज्यसभेत गोंधळ उडाला असला तरी लेखी प्रश्न -उत्तरेदेखील सुरु आहेत. या दरम्यान एका खासदाराच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत माहिती देताना सांगितले की, 2015 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी 58 देशांचा दौरा केला आहे. 2015 पासूनच्या पंतप्रधानांच्या या भेटींवर एकूण 517.82 कोटी रुपये खर्च झाले झाले आहेत. या भेटीदरम्यान, भारताने अनेक देशांशी ब-याच क्षेत्रात करार केले. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण यासह मोठ्या क्षेत्रात सामंजस्य करारही झाले आहेत. त्याच वेळी, आर्थिक विकासाच्या अजेंडावर राष्ट्रीय मिशनचा विस्तार केला गेला.

दरम्यान, कोरोना संकटापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरा केलेला नाही. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर कोणत्याही बड्या परदेशी नेत्याला भेट दिली नाही. कोरोना काळापासून पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परराष्ट्र नेत्यांशी संपर्क साधत आहेत, तसेच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण करावे लागेल, जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.

परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत माहिती दिली की, कोरोना संकटाच्या वेळी भारताने बर्‍याच देशांना मदत केली आहे. एकूण 150 देशांना औषधे, वैद्यकीय उपकरणांची मदत दिली गेली आहे. सोबतच चीनसह 80 देशांना 80 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. यावेळी जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राईलकडूनही भारताला मदत मिळाली आहे.