PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात १५ हजार, तर राज्यात ९० हजार घरांचे वाटप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी गरिबी हटावच्या घोषणा व्हायच्या. पण गरिबी हटली नाही. आधी रोटी खायेंगे, असेही म्हटले जायचे. परंतु आपले सरकार गरिबांसाठी संपूर्ण समर्पित आहे. पूर्वी घरे आणि शौचालयांअभावी माय भगिनींना अपमानित जीवन जगावे लागत असे. आपल्या सरकारने २५ कोटी जनतेला दारिद्रयरेषेतून बाहेर काढले. ४ कोटी घरे आणि १० कोटी शौचालये बांधून दिली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोलापुर येथे आयोजित कार्याक्रमात केला.

सोलापूरजवळ कुंभारी येथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने ३० हजार असंघटित कामगारांना रे नगर योजनेंतर्गत घरांच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचा ताबा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गरजुंना आज देण्यात आला.

यावेळी मोदी म्हणाले, राजकारणात दोन विचार आहेत. एक विचार लोकांच्या भावना भडकावण्याचा असतो. तर दुसरा विचार गोरगरिबांचे कल्याण साधणे. आपण सामान्यजनांच्या छोट्या-मोठ्या सुखी जीवनाच्या स्वप्नांना आकार देत आहोत. सर्वांनी नेहमी मोठीच स्वप्ने पाहावीत, त्यासाठी आमचे सरकार साथ देईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचा सर्वांगीण विकास करताना गोरगरीब जनतेच्या सुखी जीवनाचे स्वप्न पूर्ण होत आहे. जनता जनार्दनाकडून मिळणारा आशीर्वाद हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. पूर्वीच्या सरकारकडून केवळ गरिबी हटावाच्या घोषणा व्हायच्या. प्रत्यक्षात गरिबी हटत नव्हती. आमचे सरकार केवळ घोषणा न करता ठोस कामातून गरिबी हटवत आहे.

प्रभू श्रीरामाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, भगवान श्रीरामाने दिलेल्या सत्यवचनाच्या शिकवणीतून हजारो गरीब कामगारांना हक्काची घरे देण्याचा संकल्प साकार होताना आनंद होत आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या सायंकाळी प्रत्येकाने घरात रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

ते पुढे म्हणाले, अयोध्येत रामालल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा माझ्या हातून होत असल्याने हे पवित्र कार्य करण्याचे भाग्य लाभले. त्यासाठी श्रध्दाभावनेने महाराष्ट्रातील नाशिकच्या रामभक्तीने प्रेरीत पंचवटीभूमीत अनुष्ठानाला प्रारंभ केला. श्रीरामज्योतीच्या रूपाने गरिबांच्या घरातील अंधार संपविण्याची प्रेरणा मिळून त्यांचे आयुष्य प्रकाशमान होईल.

मोदी म्हणाले, ९ जानेवारी २०१९ रोजी देशात सर्वात मोठ्या ३० हजार असंघटित कामगारांसाठी घरांच्या योजनेचे भूमिपूजन मी केले. नंतर घरांच्या चाव्या देण्यासाठीही मीच येणार असल्याची हमीही दिली होती. त्याप्रमाणे आज ही हमी पूर्ण केली. मोदी गॅरंटी पूर्ण होण्याची ही गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मिळालेली घरे ही लाखो गरीब कामगारांची संपत्ती आहे. लाभार्थी कामगारांना पिढ्यानपिढ्या भोगावे आलेले कष्ट, हालअपेष्टा आता त्यांच्या नव्या पिढीला झेलावे लागणार नाहीत.

यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्यपाल रमेश भैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार संजय पाटील, भाजपचे आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि नरसय्या आडम उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Public Holiday In Maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

NCP Jitendra Awhad | १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस बंद, ही तर हुकूमशाही, जितेंद्र आव्हाडांचा केंद्रावर निशाणा