PM मोदींनी शेअर केले 18 वर्षांपूर्वीचे अटलबिहारी वाजपेयींसोबतचे रशिया दौऱ्याचे फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी रशियातील व्लादिवोस्तोक या शहरात पोहोचले असून त्यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक ट्विट करत आपल्या 18 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी केलेल्या रशिया दौऱ्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची देखील आठवण काढली. त्यांनी चार फोटो ट्विट करत म्हटले कि, मी आज 20 व्या भारत रशिया शिखर संमेलनात सहभागी झालो असताना मला 2001 मध्ये झालेल्या रशिया दौऱ्याची आठवण झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.

त्यांच्याबरोबर मला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. या चार फोटोंमधील दोन फोटो हे 2001 मधील असून दोन फोटो हे 2019 म्हणजेच या वर्षीचे आहेत. एका फोटोत मोदी वाजपेयी यांच्या मागे उभे आहेत तर एका फोटोत ते पुतीन यांच्या मागे उभे असल्याचे दिसून येत आहेत.

2001 पहिली भेट 

2001 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेलेले मोदी हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी ते भारताचे पंतप्रधान म्हणून रशिया दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे यावेळच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. त्यावेळी देखील पुतीन यांनी हसून स्वागत केल्याचे मोदींनी या दौऱ्यात आवर्जून सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये देखील रशिया दौऱ्यावर जाणार असून यामध्ये दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या करारावर सह्या होणार आहेत.