पत्नीनं पैसे परत केल्याचा संजय राऊतांचा दावा, किरीट सौमय्या म्हणाले – ‘पण हिशोब तर द्यावाच लागेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शिवसेना खा.संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. राऊत यांच्या पत्नीवर बॅंकेकडून काही कर्ज घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतू त्यानंतर खा. राऊत यांनी पत्नीने बॅकेचे 55 लाख रुपये परत केल्याचा दावा केला आहे. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खा. राऊतांवर जोरदार निशाणा साधला. अखेर राऊतांना पैसे तर परत करावेच लागले. परंतु त्यांना हिशोबही द्यावाच लागेल, असे सोमय्या म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खा. राऊतांवर निशाणा साधला आहे.

वर्षा राऊत यांची 4 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये वर्ग केले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांतील भागीदारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा केली होती.

प्रविण राऊत यांची सपत्ती जप्त

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने प्रविण राऊत यांची 72 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली होती. या प्रकरणामध्ये ईडीने प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्याकडे कोटींची संपत्ती असल्याचा दावाही केला होता. हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केली होती.