कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपये लुटणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी एटीएममधून ५३ लाख रुपये काढल्याचे तपासात उघड झाले आहे. सलमान मोहम्मद नईम बेग (वय 31), शेहबाज फारूक शेख (वय 29, रा. अंबर व्हिला, रा. मुंब्रा ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मागील वर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारला होता. चोरट्यांनी मालवेअरवर हल्ला करून त्याद्वारे व्हिसा आणि रुपे डेबीट कार्ड धारकांची माहिती चोरली होती. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली.

तपासादरम्यान, कोल्हापूर, मुंबई तसेच अजमेर आणि इंदौर शहरातील एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचे समोर आले होते. तांत्रिक बाबींचा तपास करून पोलिसांनी यापूर्वी १३ जणांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घतला जात आहे. पोलिसांना इंदौर येथून पैसे काढणाऱ्यांचा शोध घेत असताना टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार ठाण्यातून दोघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि त्यांच्या पथकाने केली. पथकाने ठाणे येथेजाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक केली या दोघांनी ५३ लाख ७२ हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ ऑगस्टपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त