पुण्यात मृतदेह ताब्यात घेण्यास कोणीही नव्हते तयार; मग, पोलिसाने कर्तव्यापलीकडे जाऊन केले अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहता माणुसकीचा दुरावा दिसत आहे. कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसलं की साधं जवळही कोणी जात नाही. मात्र, पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्तव्यापलीकडे जाऊन विशेष कार्य करत माणुसकीचे दर्शन घडवलं आहे. त्यांनी एका परप्रांतीय मजुरावर अंत्यसंस्कार केले.

अंबादास थोरे असे या 26 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सध्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 28 एप्रिलला एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पुण्याच्या सणसवाडी परिसरात आढळला. याबाबतची माहिती सणसवाडीचे पोलिस पाटील दत्तात्रय माने यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यामध्ये लालसिंह माँझी या बिहारच्या रहिवासी असलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या त्याच्याच मित्राने केली होती.

दरम्यान, या मृतदेहाचे शवविच्छेदन करून झाले होते. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर नव्हते. त्यामुळे अंबादास थोरे यांना प्रश्न पडला की पुढे काय करायचं? त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लॉकडाऊनमुळे येऊ शकत नसल्याचे त्यांनी थोरे यांना अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हे अंत्यसंस्कारही केले.

पोलिस कर्मचारी अंबादास थोरे म्हणाले…

‘मी लालसिंह माँझी याच्या एका मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले. लॉकडाऊन असल्याने येण्यास अडचणी येणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे वेळ जास्त जाणार असल्याने मृतदेह बिहारला पाठवणेही शक्य नव्हते. त्यामुळे मृताच्या कुटुंबियांनी आम्ही तुम्हाला आमच्या मुलाप्रमाणे मानतो, तुम्हीच अंत्यविधी करा आणि आम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचं अंत्यदर्शन घडवा, अशी विनंती केली. कुटुंबियांच्या विनंतीनंतर मी शिक्रापूर ग्रामपंचायतीशी संपर्क साधून अंत्यविधीची तयारी केली आणि लालसिंह माँझी याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले’.