लासलगाव : विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या 67 जणांकडून दंड वसूल

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना (कोवीड-१९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आदेश कायम ठेवले आहे. पोलीसांकडून वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु विनाकारण मौज म्हणुन अथवा महत्वाचे कामाव्यतिरिक्त घराबाहेर फिरणारे व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या नागरीकांवर लासलगाव पोलीस ठाण्यांत अद्याप पर्यंत ६७ गुन्हे दाखल करून आरोपींकडून १९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.

या प्रकरणी ६७ गुन्हे दाखल करून तसेच दाखल गुन्हयांचे अनुषंगाने मा.न्यायालयात तात्काळ दोषारोप पत्र दाखल करून अशा व्यक्तींना कायदेशीर शिक्षा होण्याचे दृष्टीने सक्त कारवाई करण्याचे निर्देश नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी दिलेले आहे. याच अनुषंगाने जिल्हयातील लासलगाव पोलीस ठाणेस लॉकडाऊन कालावधीत दाखल असलेले ६७ गुन्हयांमधील आरोपीना मा.न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. संचारबंदी कालावधीत नियमांचे उल्लंघन करणारे इसमांविरूध्द गुन्हे दाखल करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्यांमध्ये मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निफाड न्यायालयाने सबळ पुराव्यास अनुसरून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणारे वरील ६७ गुन्हयांतील आरोपींना भादवि कलम १८८,२६९, २७० मध्ये सी. आर. पी.सी. २५५ (२) प्रमाणे शिक्षा ठोठावली असुन एकुण १९,८०० रूपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.