कर्नाटक स्फोटप्रकरणात ‘या’ शिवसेना आमदाराची पोलिसांकडून चौकशी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटातील बकेटवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (रा. गारगोटी, ता. भुदरगड) असा कन्नड, तामिळी आणि इंग्रजी भाषेत नामोल्लेख आढळल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी (दि.22) आमदार आबिटकर यांचेकडे तासभर चौकशी केली. याप्रकरणाशी काही संबंध नसून आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.

स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबियांचा घातपात घडविण्याचा कट असल्याची शक्यता आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. कोल्हापूरचे एटीएसचे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आबिटकर हे शिवसेनेचे राधानगरी-भुदरगड येथील विद्यमान आमदार आहेत. स्फोटकावर त्यांच्या नावाचा उल्लेख आढळल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. तसेच विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असल्याने कोल्हापूरसह कर्नाटक एटीएस, एसआयटीसह रेल्वे पोलिसांचे त्यांचेकडे लक्ष लागले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी त्यांची तासभर चौकशी केली.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आमदार आबिटकर यांच्याकडे कर्नाटकशी तुमचे काही कनेकशन आहे का, काही व्यवहार आहेत का, कोणी तुमच्यावर दूखावले आहे का आदी माहिती घेतली. विधानसभा कालावधीत आबिटकर यांचे नाव आढळल्याने तुमचा स्फोटकाच्या बकेटवर नाव कसे आले, त्या यंत्रणेपर्यंत पोहचण्यासाठी कोल्हापूर आणि कर्नाटक पोलीस संयुक्त तपास करती असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Visit : Policenama.com