देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप, म्हणाले – ‘मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केल्याचा संशय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 9) अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

अधिवेशनात मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी फडणवीस यांनी हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला. सचिन वाझे माझ्या पतीचे ओळखीचे असून त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वाझे यांच्याकडे होती. 26 फेब्रुवारी रोजी माझे पती वाझे यांच्यासोबत मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. त्याठिकाणी हिरेन यांची चौकशी झे यांनी केली. वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली, चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज दिला तोही वाझेंच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्या, 2-3 दिवसात बाहेर काढू असेही सांगितले होते, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. तसेच मनसुख यांनी भावाशी वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होते. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून 40 लाखांनी खंडणी मागितली.

या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली आहेत. मनसुख यांचे शेवटचे लोकेशन गावडेकडे होते आणि त्या नंतर 40 किमी अंतरावर मुंब्य्राच्या खाडीत मृतदेह फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आल्याचे फडणवीस म्हणाले. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना 302 गुन्ह्याखाली अटक करावी. सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.