पाच हजाराची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यातील हवालदार रंगराव भागोजी मनुगडे (वय 56, रा. सुर्वेनगर) याला पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि.20) रंगेहाथ पकडले. कळंबा रिंगरोडवर भरदुपारी ही कारवाई करण्यात आली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार आनंद गायकवाड (रा. उजळाईवाडी) हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी आपटेनगर येथील गट नं. 1034/1मध्ये प्लॉट क्रमांक 45 हा संजय कोळेकर यांच्याकडून खरेदी केला आहे. त्याचा नोटरी स्टॅम्पवर व्यवहार झाला आहे. मात्र, कोळेकरने नातेवाईकाची फसवणूक केल्याची गायकवाड यांची तक्रार दिली आहे. सदरची जागा व्हेरोनिका डेव्हलपर्सचे संचालक बाबासाहेब वरोटेंच्या मालकीची होती. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. त्याचा निकालही कोळेकरविरुद्ध झालेला आहे.

दरम्यान तक्रारदारांच्या नातेवाईकांनी सदर प्लॉटवर घर बांधले असून त्याच्या शेजारीच कोळेकरचे मित्र शिवाजी सुतार,जयवंत यादव यांचेही प्लॉट्स आहेत. जागेच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी तक्रारदाराचे सासरे आणि  शिवाजी सुतार यांच्यात वादावादी झाली. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत तक्रारदार गायकवाड, त्यांची पत्नी आणि अन्य आठजणांवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास मनुगडे करीत होता. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी  केली.

असा रचला सापळा

पकडण्यात आलेल्या हवालदाराने बुधवारी सकाळी तक्रारदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. पती, पत्नी यांना अटक न कारण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. शेवट तडजोडीअंती हा सौदा पाच हजारांवर ठरला. मनुगडे याने गायकवाड यांच्याशी संपर्क साधून रोख रकमेसहित त्यांना कळंबा रिंगरोड, सुर्वेनगर मूग जनरल स्टोअर्स दुकानासमोर येण्यास सांगितले. तक्रारदाराकडून रक्‍कम स्वीकारताच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे व पथकाने सापळा रचून हवालदाराला रंगेहाथ पकडले. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असेही गोडे यांनी सांगितले.