पोलिसपुत्रच निघाला क्राईम ब्रँचचा तोतया पोलिस…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – स्पेशल क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करुन कॉलेजच्या विद्यार्थ्यांला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया पोलिसांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे हे दोन भामटे पोलीस पोलिसांच्या जाळ्यात सापडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकजण पोलिसाचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेमंत शांतिलाल परदेशी (वय २३, रा. पोलिस मुख्यालय, नाशिक) आणि प्रशांत सुदाम नवले (२२, आडगाव) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ऋषिकेश विनोद काळे (२३, अशोकनगर, सातपूर) या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. हि घटना  ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.
घटनेच्या दिवशी दुपारी दीड ते दोन दरम्यान ऋषिकेश व्ही. एन. नाईक कॉलेजजवळ आला असताना आरोपी त्याच्याजवळ आले. आम्ही स्पेशल क्राईम ब्रँचमध्ये पोलिस आहोत, अशी ओळख करून देत त्यांनी ऋषिकेशला कॉलेजच्या गेटवर आणले. संशयित प्रशांत नवले याने ऋषिकेशला आपल्या बुलेटवर बसवून सरकारवाडा पोलिस स्टेशन, केटीएचएम कॉलेज परिसर येथे फिरविले. त्यानंतर या दोघा तोतया पोलिसांनी त्याला अशोकस्तंभाजवळील एका सहकारी बँकेजवळ नेले. तेथे त्याचा मोबाइल फोन व दुचाकीची चावी काढून घेण्यात आली. त्यानंतर या तोतया पोलिसांनी त्याला एटीएम सेंटरमधून हजार रुपये काढण्यास पाठविले.
याच वेळी ऋषिकेशला संशय आल्याने त्याने सतर्कता दाखवीत शहर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता हे दोघे तोतया पोलिस पळून गेले. बुलेटच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी दोघा संशयितांची ओळख पटविली. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की दोघा संशयित आरोपींना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित स्पष्ट दिसत असून, कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जाहिरात