एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर २५ कोटींचा खर्च ; इतर पक्षांकडून किती ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका संपल्या आणि सर्व पक्षांनी उडवलेला राजकीय धुरळा अखेर शांत झाला. या सगळ्यात प्रचाराचे वेगवेगळे तंत्र राजकीय पक्षांनी अवलंबले. यात फेसबुक, गुगल यांसारख्या डिजीटल माध्यमांचा सर्वाधिक वापर करण्यात आला. या सगळ्या राजकीय पक्षांनी या डिजिटल प्रचारावर जवळपास ५३ कोटी रुपये खर्च केले आहेत. या आकडेवारीनुसार सत्ताधारी भाजपने सोशल मीडियावर सर्वाधिक खर्च केला आहे.

या संदर्भात फेसबुकने एक अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. यात त्यांनी कोणत्या राजकीय पक्षाने किती जाहिरात दिल्या होत्या, या सगळ्याचा लेखाजोखा मांडला आहे. १५ मे पर्यंत फेसबुकला १ कोटी २१ लाख छोट्या-मोठ्या जाहिराती मिळाल्या आहेत. या जाहिरातींवर सर्व राजकीय पक्षांनी २६ कोटी ५ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचप्रमाणे गुगल, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर आतापर्यंत १४ हजार ८३७ जाहिराती झळकल्या आहेत. या जाहिरातींसाठी राजकीय पक्षांकडून २७ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

काँग्रेसचा खर्च

या सगळ्यावर काँग्रेसने किती खर्च केला आहे, याची अधिकृत आकडेवारी फेसबुकने जाहीर केली आहे. या अहवालानुसार काँग्रेसने फेसबुकवर ३ हजार ६८६ जाहिराती दिल्या आहे. यासाठी त्यांनी १ कोटी ४६ लाख रुपये खर्च केले. त्याचबरोबर त्यांच्या घटकपक्षांनी या जाहिरातींवर २ कोटी रुपये खर्च केल्याचे समोर येत आहे.

भाजपचा खर्च

या सगळ्यावर सत्ताधारी भाजपने सर्वात जास्त खर्च केल्याचे समोर येत आहे. यात २५०० जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातींमागे ४ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या सगळ्यात माय फर्स्ट वोट फॉर मोदी, भारत के मन की बात, नेशन विद मोदी यांसारख्या योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुगलच्या विविध प्लॅटफॉर्मवर जाहिरातबाजीसाठी भाजपने १७ कोटींचा खर्च केला आहे. यानुसार सत्ताधारी भाजपने यंदाच्या निवडणुकीदरम्यान २५ कोटींहून अधिक खर्च केल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या सगळ्याचा राजकीय पक्षांना किती फायदा होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होईलच.