मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे लखनऊमध्ये निधन, PM मोदी म्हणाले – ‘दुःखी आहे’

लखनऊ : वृत्त संस्था – मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज निधन झाले. लखनऊ येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांचे पूत्र अशुतोष टंडन यांनी ट्विट करून दिली. लालजी टंडन मागील काही दिवसांपासून आजारी होते. ते 85 वर्षांचे होते. दरम्यान, PM नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

लालजी टंडन यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील सुमारे दिड महिन्यापासून उपचार सुरू होते. त्यांना किडनी आणि लिव्हरची समस्या जाणवल्याने अ‍ॅडमिट करण्यात आले होते.

त्यांना मागील 11 जूनरोजी श्वास घेण्याचा त्रास, ताप आणि लघवीला त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. टंडन यांची प्रकृती खराब असल्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

मुळ उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय राहणारे टंडन राज्याच्या भाजपा सरकारमध्ये अनेकदा मंत्रीसुद्धा होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी वाजपेयी यांचा मतदार संघ लखनऊची जबाबदारी सांभाळली होती. वाजपेयी यांच्या निधनानंतर ते लखनऊमधूनच 15व्या लोकसभेसाठी निवडूण आले.