राजीनाम्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्यावरील दबाव वाढला, अधिवेशनाच्या आधी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड खूप अडचणींमध्ये सापडले आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मी निर्णय घेण्याआधी तू घे, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुनावले आहे.

संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी बदनाम होत आहे. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा नाराज झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी संजय राठोड यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजय राठोड हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.

तर दुसरीकडे जर संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याची भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. आतापर्यंत राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी त्यांचा राजीनामा घेण्यात येईल असे बोलले जात आहे. मग हे सरकार कशाची वाट पाहत आहे. या सरकारकडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देण्यात येत आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नसल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

शरद पवार सुद्धा नाराज ?
पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता मला याबाबत काहीच माहिती नाही असे सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत
वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. राज्यात कोरोनाचे संकट असताना ही गर्दी पाहायला मिळाली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता जमलेली गर्दी हि बाब गंभीर आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. मंगळवारी जमलेल्या गर्दीबद्दल उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत असे सुद्धा संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.