पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक, म्हणाल्या – ‘मला काहीच फरक पडत नाही, तुम्हा सर्वांना एकटी पुरुन उरणार’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पुजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणा-या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. वाघचा नवरा म्हणून शिक्षा देतात का ? पण याचा मला काहीच फरक पडत नाही. माझा न्याय संस्थेवर विश्वास आहे, मुर्दाड सरकारवर नाही. मला कितीही त्रास दिला तरी तुम्हाला सगळ्यांना मी चित्रा वाघ एकटी पुरुन उरणार, असे त्यांनी बजावले आहे. तसेच मला आज पवार साहेबांची आठवण येत आहे. तो माझा बाप आहे. ज्यावेळी हे प्रकरण बाहेर आले त्यावेळी मी सिल्व्हर ओकवर गेले होते. पवार साहेबांनी सर्व प्रकरण पाहून तुझा नवरा अडकणार नाही, असे पवारसाहेब म्हणाले होते, असे वाघ यांनी यावेळी सांगितले.

चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाल्यानंतर मला धमक्यांचे फोन येत आहेत. माझे विकृत फोटो वायरल केले. पण मला फरक पडत नाही. माझ्या नवऱ्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माझ्या फॅक्ट्री नाहीत. चौकशीसाठी घरी येऊन नोटीस दिली गेली. गुन्हा दाखल केला तेंव्हा व्हॉट्सॲप वरून कळवतात, असे वाघ म्हणाल्या. माझा नवरा तर कुठेच नव्हता, तरीही गुन्हा दाखल झाला आहे. ज्याने पैसे घेतले त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. गजानन भगत या मुख्य आरोपीला का सोडले असा सवाल त्यांनी केला आहे. 2011 पासूनच्या अनेक केस प्रलंबित आहेत. एवढी तत्परता आता कशी काय दाखवली, असेही त्या म्हणाल्या.