‘आता मीच तुम्हाला पुरून उरणार’, चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडीला ‘आव्हान’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात सध्या चालू असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ या खूपच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून धरलं आहे. त्यातच आता चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना त्या अधिकच आक्रमक झाल्या.

काय म्हणाले चित्रा वाघ

आपल्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यांनतर चित्रा वाघ म्हणाल्या, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. किती तर म्हणे ९० टक्के बेहिशेबी मालमत्ता. मात्र याबद्दलची माहिती मला अजून कळलेली नाही. जी काही माहिती कळाली ती पत्रकारांकडून कळालेली आहे. गुन्हा दाखल झाल्याची कॉपी सुद्धा मला व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली. प्रत्यक्ष कॉपी पाठवायला एसीबीकडील माणसं संपली का, असा सवाल सुद्धा चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात माझ्या नवऱ्याने एक रुपयासुद्धा घेतलेला नाही. जेव्हा हा प्रकार घ़डला, तेव्हा माझा नवरा त्या घटनास्थळाच्या पाच किमी परिसरातही नव्हता. असेही चित्रा वाघ यांच्याकडुन सांगण्यात आले. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीची अद्याप चौकशीही झालेली नाही, असा दावासुद्धा चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आला आहे.

तसेच चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, आज मला शरद पवार साहेबांची आठवण येत आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार साहेबांकडे मी गेले होते. पवार साहेबांना मी त्या तक्रारीची कॉपी दिली. तेव्हा पवार साहेब म्हणाले की, यात तुझा नवरा कुठेच दिसत नाही. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती लढाई अजून आम्ही लढत आहे. या प्रकरणात आम्ही सहकार्य करायला तयार आहे. तरीसुद्धा माझ्या पतीला मानसिक त्रास देण्यात येत आहे. खरं तर या प्रकरणात मला अडकवायचं होतं तशी चाचपणीसुद्धा करण्यात आली होती. आता आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू.

चित्रा वाघ यांचे प्रतिआव्हान

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या कि, तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. तुम्हाला काय वाटतं गुन्हा दाखल झाला म्हणून मी गप्प बसणार, मी गप्प बसणार नाही. आता तुम्हाला मीच पुरून उरणार. नाहीतर माझं नाव चित्रा वाघ म्हणून सांगणार नाही. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानचं चित्रा वाघ यांच्याकडून महाविकास आघाडीला देण्यात आले आहे.