Pooja Chavan Suicide Case : गुन्हा नोंद करण्यासाठी पूजा चव्हाणची आजी शांता राठोड आणि तृप्ती देसाई यांचे वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री संजय राठोड यांच्यासह अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजा चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी पूजा चव्हाण तिची चुलत आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्ते देसाई यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या गेटवर आंदोलनास सुरुवात केली आहे.. जोपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नसल्याचा निर्धार देसाई आणि शांता राठोड यांनी केलाय..

पूजा चव्हाण यांची चुलत आजी म्हणून घेणाऱ्या शांता राठोड आज पूजा चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुण्यात आल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्यात भेट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना शांताबाई राठोड म्हणाल्या, पोलिसांनी माझा जबाब नोंदवून घेतला आहे. परंतु अद्यापही गुन्हा नोंद केला नाही. जोपर्यंत गुन्हा नोंद केला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही. जबरदस्तीने गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा तृप्ती देसाई आणि शांताबाई राठोड यांनी या वेळी घेतला आहे.