Pooja Chavan Suicide Case : राठोड यांचा राजीनामा घेतला, गुन्हा का दाखल केला नाही; पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रात्री दोन वाजता ते दोन मुलं कशाला आले? तिला घेऊन ते दोघं दवाखान्यात कसं येऊ शकतात? त्यांच्यासोबत कोण कोण होते? इथं कशामुळं राहत होते? कोणत्या कॉलेजात शिकायला होती? याची चौकशी झाली का? ही चौकशी झाली नसेल, तर मी पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करेल, असे पूजाच्या आजी शांताताई राठोड यांनी म्हटले आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा सरकारने राजीनामा घेतला आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी पूजा चव्हाण हिची आजी शांताबाई राठोड (चव्हाण) यांनी वानवडी पोलिसांकडे केली.

याप्रसंगी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, कांतीलाल गवारे, करुणा लोणारे, दौलतराव शेंडे वानवडी पोलीस स्टेशनसमोर बसकन मारली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह सर्वांना चर्चा करण्यासाठी या अशी विनंती केली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. तृप्ती देसाई यांनी रात्री उशिरा पोलिसांबरोबर चर्चा करण्यास संमती दाखविली.

शांताताई राठोड (चव्हाण) यांनी सांगितले की, पूजा चव्हाण हिचा गर्भपात करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे संजय राठोड आणि अरुण राठोड यांच्यासह या प्रकरणात जे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी. तसेच फिर्यादीमध्ये मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहे. दरम्यान, पोलिसांचं म्हणणं आहे की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कोणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलीस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल, तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांताताई राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, शांताताई म्हणाल्या की, पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलीस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत. जोवर कायद्याचा धाक नाही, तोवर हे असंच वातावरण राहिल. पोलिसांनाही धाक पाहिजे, असं शांताताई यांनी म्हटलं आहे. पोलीस स्टेशनच्या शेजारी एवढी पोलिस घटना घडली, तरी साधी चौकशीसुद्धा का पोलिसांनी केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.