पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला. मात्र या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. या पत्रात राठोड यांचा बळी देऊ नका असा उल्लेख केला होता. त्यानंतर या प्रकरणात पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. 1) धक्कादायक आरोप केले आहेत. पुजाच्या आईवडिलांना राठोड यांनी 5 कोटी दिल्याने ते या प्रकरणातही काहीही बोलणार नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मात्र मी न्यायासाठी लढत राहणार. तसेच पूजाच्या आई-वडिलांना 5 कोटी राठोड यांनी दिल्याचे पुरावे वेळ आल्यावर देईन असेही त्या म्हणाल्या. मात्र आता हे आरोप पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी फेटाळून लावले असून राठोड यांच्याकडून कुठलेही पैसे घेतले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शांताबाई राठोड यांनी केलेल्या आरोपावर लहू चव्हाण म्हणाले की, पूजाच्या मृत्यूबाबत कोण काय बोलतय ते माहिती नाही, आम्ही आमच्या दु:खात आहोत, शांताबाई या आमच्या लांबच्या नातेवाईक असल्याचे सांगत या आरोपावर जास्त बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पूजा प्रकरणात होणारी बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे. परंतु अद्याप बदनामी थांबली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आता थकलोय, कृपया आतातरी बदनामी थांबवा अशी आर्त विनवणी लहू चव्हाण यांनी विरोधकांना करत पूजा ही तुमच्या लेकीसारखी असून तिला न्याय द्या पण बदनाम करू नका असे म्हटले आहे. संशयावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती, तसेच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे लहू चव्हाण म्हणाले.