३३ हजार रुद्राक्षांनी साकारली शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती त्यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एका चाहत्याने ३३ हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून प्रतिमा साकारली आहे. शिवसेना भवनासमोर हे ८ फुटांचं पोर्ट्रेट लावण्यात आलं आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी चेतन राऊत या कलाकाराने रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची ही अनोख्या पद्धतीने प्रतिमा साकारली आहे. ८ बाय ८ फूट या आकारातील ही प्रतिमा असून तब्बल ३३ हजार रुद्राक्षांचा वापर केला आहे. त्याने आपल्या दहा सहकार्यांच्या मदतीने ही प्रतिमा साकारली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रुद्राक्षाशी विशेष नाते होते. यामुळे मी रुद्राक्षांनी त्यांची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा बनवून आपण जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. असे कलाकार चेतन राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान असलेल्या बंगल्यात हे स्मारक होणार आहे. महापौर बंगल्याला हेरिटेज दर्जा असल्यामुळे मूळ बंगल्यात कोणताही बदल न करता बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक अंडरग्राऊंड होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सकाळी १० वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणेश पूजन होऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.