मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्षपणे दौरा करावा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे लाखो हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा, त्याने लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा सल्ला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या आठ दिवसांपासून पडलेल्या परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. यामध्ये ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात, कापूस, तूर अशा लाखो हेक्टवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यात म्हटले आहे की, ‘वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी गेलं आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय मदत देणार हे जाहीर करावे,’ असे मत त्यांनी मांडले आहे.

शरद पवार दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर
मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद मधील नुकसान ग्रस्त भागांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट देणार आहे.