‘ते’ ट्वीटर अकाऊंट माझे नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.’, असे ट्वीट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आले होते. हे ट्वीट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. शिवाय यावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. मात्र आता त्यावर ते ट्वीटर खाते माझे नाही, आणि ते ट्वीटही मी केले नाही, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

‘ते’ ट्विटर खाते आणि ट्वीट माझे नाहीच, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अशा कोणत्याही स्वरुपाचे ट्वीट आपण केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेससोबत समसमान पातळीवर चर्चा याबाबत तूर्तास काहीच भूमिका नाही. वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करुन पुढील भूमिका घेतली जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर एमआय़एमला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी करत लोकसभा निवडणूकींच्या रिंगणात उतरले. दलित-मुस्लिम मतं मिळवत आपली जागा निर्माण केली. लोकसभेत म्हणावे तसे यश यांच्या आघाडीला मिळाले नाही. मात्र त्यांच्या मतविभाजनाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्वांचे लक्ष वंचित आघाडीने आपल्याकडे ओढून घेतले. त्यानंतर आता विधानसभेबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. विधानसभेत आम्ही एमआयएमला सोबत घेऊन लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला नक्की याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसंच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी वकिल संजीव पुनाळेकरांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावर पुनाळकरांची अटक ही जहाल हिंदुत्ववादी संघटनांना मोदी सरकारने दिलेला इशारा आहे. आजवर ही कारवाई का झाली नाही याचे उत्तर दोन्ही सरकारने द्यावे, यापुढे मोदीविरुद्ध जहाल हिंदुत्ववादी संघटना असा संघर्ष सुरु होईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.