‘लोक जनशक्ती पार्टीशी आमचा काहीही संबंध नाही’, मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहार विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच बाकी आहे. बिहारमधील राजकीय वातावरण तापू लागल आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांना भाजपचीच फूस असल्याची उघड चर्चा आहे. यामुळे सत्ताधारी एनडीएमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे भाजपला आता चिराग पासवान यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. आतापर्यंत चिराग पासवान यांच्याविरोधात भाजपनं थेट बोलणे टाळले होते. आता मात्र, भाजपचे नेते चिराग यांना लक्ष्य करु लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी चिराग पासवान यांच्यावर आरोप केले आहे. भाजपकडून जेडीयूच्या विरोधात राजकारण सुरू आहे.

प्रकाश जावडेकर म्हणाले की लोक जनशक्ती पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. अशा प्रकारचे संभ्रमाचे राजकारण आम्हाला आवडत नाही. बिहारमध्ये भाजपची संयुक्त जनता दल (जेडीयू), जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांच्याशी आघाडी आहे. एनडीए तीन चतुर्थांश जागा राज्यात मिळवेल. एलजेपी हा केवळ ‘व्होट कटुआ’ असून, त्यांचा फारसा परिणाम होणार नाही.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे.

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे सरचिटणीस व बिहार प्रभारी भूपेंद्र यादव म्हणाले की, चिराग पासवान यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये अथवा भ्रम पसरवू नये. पासवान यांच्याकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.