आता देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचे प्रसाद आपल्या घरी पोहोचविणार टपाल विभाग, ऑनलाईन करा बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टपाल विभाग आतापर्यंत लोकांच्या घरी पत्रे पाठवत असे, परंतु आता ते देशातील प्रसिद्ध मंदिरांचे नैवेद्यही आपल्या घरी पोहोचवणार आहे. कोरोना कालावधीमुळे भक्तांना प्रख्यात मंदिरांमध्ये देवाचे दर्शन होऊ शकत नाहीत पण जर देवाचा प्रसाद घरी बसून मिळाला तर, मनातील ही इच्छा डाक विभाग पूर्ण करणार आहे. दरम्यान, यासाठी आपल्याला आपला खिसा थोडा सैल करावा लागेल.

 या देवळांचा मिळू शकेल  नैवेद्य 

 टपाल विभाग केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिर आणि हनुमान गढी अयोध्या मंदिरातील प्रसाद लोकांच्या घरी पोहोचवेल. यासह टपाल खात्याने काशी विश्वनाथ मंदिरााचा प्रसाद भाविकांच्या घरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा देशभर उपलब्ध होईल, असे पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. टपाल विभागाने या प्रसिद्ध मंदिराचे प्रसाद देशभरात पोहोचविण्यासाठी त्यांच्यासह एमओयू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून प्रसाद बुक करू शकतात. दरम्यान यापूर्वी टपाल विभागाने माता श्री वैष्णो देवीच्या प्रसादाची सेवा सुरु केली होती.