पक्षाच्या आदेशावर मी निवडणूक लढवणार ; कोण म्हणाले वाचा सविस्तर 

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस पार्टीने आदेश दिल्यास मी लोकसभेची निवडणूक सांगली लोकसभा मतदार संघातून लढण्यास तयार आहे असे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी म्हणले आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. गत निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी या मतदार संघात महत्वाची भूमिका बजावली असून आता हि ते भाजपच्या संपर्कात आहेत त्यांनी काँग्रेसच्या आमदारांवर स्तुती सुमने उधळली असली तरी ते भाजपच्या संपर्कात आहेत असे प्रतीक पाटील म्हणाले आहेत.

सांगली लोकसभा मतदार संघात आपणच भाजपचे उमेदवार असणार आहे असे या आधीच भाजप खासदार संजय पाटील यांनी जाहीर केले आहे. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रतीक पाटील आणि युवानेते विशाल पाटील या तिघांच्या नावांची शिफारस काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ समितीकडे करण्यात आली असून आपण पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत असे प्रतीक पाटील म्हणाले आहेत.  आता सांगलीत काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्याही नावाची अंधुक अंधुक चर्चा सांगली लोकसभेसाठी केली जाते आहे.

आमच्या पक्षाचे नेते एक आहेत. फक्त नेत्यांचे गट आहेत नेत्यांच्या गटांमुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात या वादातूनच पुढे नेत्यांचे वाद आहेत का असा लोकांचा गैरसमज होतो. तर डॉ. विश्वजीत कदम यांनी आपण कोणाला हि सांगलीच्या उमेदवारी बद्दल मागणी केली नाही असे आपणास भेटून सांगितले असे प्रतीक पाटील म्हणाले आहेत. पक्षाने कोणताही उमेदवारी दिला तरी त्याच्या पाठीशी आपण ठाम उभा राहणार आहे अशी माझी आणि डॉ. कदमांची भूमिका आहे असे प्रतीक पाटील म्हणाले.

आमदार अनिल बाबर यांना पक्षात यायचे असेल तर त्यांनी जरूर यावे कारण त्यांच्या सारख्या नेत्यांची पक्षाला आवश्यकता आहे, त्यांना पक्षात घ्यायला आम्हाला कसलीच अडचण नाही. कारण माझ्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी मला अनिल बाबर आणि  माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी मला खूप मदत केली होती असे प्रतीक पाटील म्हणाले आहेत. गत निवडणूक भाजपने मोदी लाटेवर जिंकली तर आता २०१९ च्या सांगली लोकसभेत कुणाचा जय होणार या कडे सर्व सांगलीकर जनतेचे लक्ष लागले आहे.