प्रवीण गायकवाड यांना वंचित आघाडीनं पाठींबा द्यावा

पुणे : (पोलीसनामा विशेष) – (मल्हार जयकर ) –  पुणेशहर लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार उभा न करता गायकवाड यांना पाठींबा द्यावा यासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळाने ॲड. प्रकाश आंबेडकर, यांची भेट घेऊन त्यांना साकडं घातलं. त्याला आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजते.

खेडेकर, कोकाटे, कुंजीर, पासलकर यांचा सहभाग
माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघाचे पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर व इतरांचं एक शिष्टमंडळानं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन प्रवीण गायकवाड यांनी बहुजनांचं नेतृत्व करतानाच वंचितांसाठी कसं आणि काय काम केलंय याची सविस्तर माहिती दिली. जर प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार न देता वंचितांचं नेतृत्व करण्यासाठी गायकवाड यांना पाठींबा द्यावा अशी विनंती या शिष्टमंडळाने केली.

मुस्लिम-बहुजनांमध्ये सौहार्द निर्माण केलं
राज्यात आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या पुढाकाराने मराठा समाजाचे जे मूकमोर्चे निघाले त्याचे नियोजन गायकवाड यांनी केलं होतं. या मोर्चाच्यावेळी विविध शहरात मुस्लिम समाजानं ठिकठिकाणी जे स्वागत करून मोर्चातील लोकांना ज्या सेवासुविधा दिल्या त्यासाठीही गायकवाड यांनी प्रयत्न केले. त्यामुळं हिंदू-मुस्लिम यांच्यात सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यामुळं राज्यात कुठेही बहुजन-हिंदू-मुस्लिम असा संघर्ष निर्माण झाला नाही. याकडे आंबेडकरांचे या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

भीमा-कोरेगाव प्रकरणात सामंजस्याची भूमिका
भीमा-कोरेगाव प्रकरणी राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्यावेळी सामंजस्याची भूमिका घेत दलित-मराठा असा वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न निर्माण झाला होता तो गायकवाड यांनी हाणून पाडला. दलित-मराठा असा संघर्ष होऊ दिला नाही. त्यावेळीही गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंबेडकर यांच्यासोबतहोते. आरक्षणासाठी मराठा मोर्चे निघाल्यानंतर दलित समाजामध्ये बुद्धिभेद करून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न झाला होता. दलितांचं हक्काचं आरक्षण मराठा समाज हिसकावून घेतोय अशी भावना निर्माण करण्यात आली. तेव्हाही मराठा महासंघाचे पुरुषोत्तम खेडेकर, श्रीकांत कोकाटे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर आणि स्वतः प्रवीण गायकवाड यांनी आंबेडकर यांची भेट घेऊन मराठ्यांच्या विरोधात दलितांचे मोर्चे काढू नयेत, मराठा समाजाचे मोर्चे हे वंचितांचेच मोर्चे आहे हे पटवून दिलं होतं. त्यानंतर दलितांचे निघणारे प्रतिमोर्चे स्थगित करण्यात आले. त्यामुळं राज्यात निर्माण होऊ घातलेला दलित-मराठा संघर्ष झाला नाही. हे शिष्टमंडळाने आंबेडकरांसमोर स्पष्ट केलं.

आंबेडकरांचा सकारात्मक प्रतिसाद
शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांना विनंती केली की, जातीयवादी शक्तीविरोधात गायकवाड नेहमीच आग्रही असतात, संघर्ष करीत असतात. वंचितांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. वंचित बहुजन आघाडीनं पुण्यात उमेदवार उभा केला तर बहुजनांच्या वंचितांच्या मतांमध्ये विभागणी होईल. ती टाळावी यासाठी इथं उमेदवार उभा न करता गायकवाड यांना पाठींबा द्यावा ते वंचितांचं प्रतिनिधित्व करताहेत असं सांगून शिष्टमंडळाने आंबेडकर यांना विनंती केली त्यावेळी आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजते. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती झाली नाही. काही ठिकाणी आघाडीनं उमेदवार उभे केले आहेत. प्रवीण गायकवाड आणि प्रकाश आंबेडकर यांची विचारसरणी एकच आहे, बहुजनांचा, वंचितांचा, मुस्लिमांचं विकास व्हावा त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी अशीच गायकवाड यांची भावना आहे त्यांची वाटचाल त्याच दृष्टीनं सुरू आहे. तेव्हा गायकवाड यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीनं उभं राहावं, अशी विनंती शिष्टमंडळाने आंबेडकर यांच्याकडे केली.