‘ही’ तर शिवसेना अन् राष्ट्रवादीची मध्यावधी निवडणुकीची तयारी, की…?, सध्या चर्चा

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. त्यातच काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर होणारे गंभीर आरोप आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुरु केलेला जनतेसोबतचा संवाद, तर काँग्रेसने केलेलं पक्षांतर्गत बदल या सर्व घडामोडीमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी तर नाही ना…अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीने संघटनात्मक बांधणीसाठी राज्यात परिसंवाद यात्रेचे आयोजन केलं आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यँत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील गावं न गाव पिंजून काढत आहेत. त्यातच मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, या बैठकीत २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवा, असा आदेश नेत्यांना देण्यात आला आहे. एकूण दोन्ही पक्ष आणखी संघटनात्मक बांधणीसाठी संवाद दौरे काढत आहेत.

ADV

दुसरीकडे काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांनी निवड करत पक्षात काही बदल केले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षासह ६ कार्यकारी अध्यक्ष पक्षवाढीसाठी कामाला लागले आहे. तर भाजपही विविध पातळीवर बैठका घेत आहेत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला जास्त काळ विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान केले होते. या एकूण सर्व घडामोडीमुळे हे सर्व पक्ष मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहेत का? असा प्रश्न पडतो.

काही दिवसापासून महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यामुळे अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. त्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाकडे पक्ष गांभीर्याने पाहत आहे असं म्हटलं होतं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तत्कालीन भाजपा नेते कृष्ण हेगडे यांनी या महिलेवर ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले होते. अलीकडेच कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रकरणात भाजपाने इतकी आक्रमकता दाखवली नाही मात्र, शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात भाजपचा कमालीचा आक्रमक झाला आहे. राज्यात सुरू असणाऱ्या या राजकीय घडामोडींबाबत राजकीय विश्लेषक म्हणतात की, मध्यवधी निवडणुका कोणत्याही पक्षाला परवडणार्या नाहीत. याला केवळ भाजप अपवाद आहे. दुसरीकडे सरकारचा काँग्रेसने उद्या अचानक पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला तर दोलायमान स्थिती होऊ शकते. अशा वेळी लागलीच पर्यायी सरकार उभे राहिले नाही तर मध्यावधी निवडणुका होतील. परंतु, राष्ट्रवादी पर्यायी सरकार उभं करु शकत त्यामुळे मध्यवधी निवडणुका शक्य नाही. पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची निर्मिती झाली त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते.

दुसरे एक राजकीय विश्लेषक म्हणाले, प्रत्येक पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असतो. त्याअनुषंगाने राष्ट्रवादीने परिसंवादाच्या माध्यमातून तर शिवसेना शिवसंपर्काद्वारे तेच करत आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीचा प्रश्न येत नाही.

भाजपची जागा कमी करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत. तसेच काँग्रेसचीही जागा शिवसेना, राष्ट्रवादीला घ्यायची आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी येत्या काळात आणखी आक्रमकपणे दिसतील असेही एका राजकीय विश्लेषकाचे म्हणने आहे.