मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हयातील कर्जत, श्रीरामपूर तालुका, नेवासा, सोनई, राजूर, शेवगाव येथे एकूण ३६ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. रविवारी (दि. २४) रोजी निवडणुकीचे प्रत्‍यक्ष मतदान होत आहे. सोमवारी (दि. २५) झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. यासाठी महाराष्‍ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी नियमन आदेश जारी केले आहे.

अहमदनगर जिल्‍हयातील कर्जत, श्रीरामपूर, नेवासा, सोनई, राजूर ,शेवगाव येथे एकूण ३६ ग्रामपंचायत हद्दीत  कोणत्‍याही इसमास खालील कृत्‍य करण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे. रस्‍त्‍यावरील किंवा रस्‍त्‍याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी गैरशिस्‍त वागणुक, कोणत्‍याही मिरवणुका, रॅली, सभा ठरविलेल्‍या मार्गाव्‍यतिरिक्‍त नेण्‍यास तसेच दिलेले ठिकाण, वेळ व्‍यतिरिक्‍त इतर मार्गाने नेण्‍यास व वेळेचे उलंघन करण्‍यास, सर्व मिरवणुकीच्‍या व जमावाच्‍या प्रसंगी व प्रार्थना स्‍थळाचे आसपास प्रार्थनेच्‍या य वेळी कोणत्‍याही रस्‍त्‍यावरील किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांचे एकत्र जमण्‍याचे जागी गर्दी करण्‍यास किंवा अडथळा निर्माण करण्‍यास, सर्व रस्‍त्‍यावर, रस्‍त्‍यामध्‍ये, घाटात सर्व धक्‍यावर किंवा धक्‍यामध्‍ये आणि सार्वजनिक स्‍नानाच्‍या उतारण्‍याचे ठिकाणी व जागांमध्‍ये जत्रा, देवालय, मशीद, दर्गा आणि सार्वनिक किंवा लोकांच्‍या जाण्‍या येणाच्‍या जागांमध्‍ये गोंधळ बेशिस्‍तपणे वर्तणुक करण्‍यास, कोणत्‍याही रस्‍त्‍यात, रस्‍त्‍याजवळ किंवा सार्वजनिक अनियमीत व विनापरवाना जागी वाद्य वाजवण्‍यास, गाणी म्‍हणण्‍यास ढोल ताशे वाजण्‍यास , कर्कश वाद्य  वाजवण्‍यास व  कोणत्‍याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्‍याही सार्वजनिक उपहाराचे जागेत ध्‍वनीक्षेपकाचा विनापरवाना उपयोग करण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे.

याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्‍यकता असल्‍यास कर्जत, श्रीरामपूर, तालुका, नेवासा, सोनई, राजूर, शेवगाव पोलिस स्‍टेशन प्रभारी अधिकारी  यांना आपले अधिकाराखाली असलेल्‍या क्षेत्रात प्रसंगानुसार आवश्‍यक ते कोणत्‍याही नियमांचे आदेशांचे उलंघन होणार नाही अशा रितीने आवश्‍यक ते आदेश देण्‍याचा अधिकार प्रदान करण्‍यात येत आहे. हा सदरचा आदेश  दिनांक 28 फेब्रुवारी २०१९ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत तो अंमलात राहील, असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.