संतापजनक ! मंत्रसिद्धीने मुलाचा कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने पुजाऱ्याचा शास्त्रज्ञाच्या पत्नीवर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रसिद्धीने मुलाचा कॅन्सर बरा करतो असे सांगत एका शास्त्रज्ञाच्या उच्चशिक्षित पत्नीवर पुजाऱ्याने बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याचे चित्रिकरण करून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपये उकळले. या महिलेच्या मुलाचा मागील वर्षी मृत्यू झाला आहे. शेवटी तिला हा प्रकार असह्य झाल्याने पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत दाम्पत्य चेंबूर परिसरात राहण्यास आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. पती शास्त्रज्ञ आहे. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याला कॅन्सर असल्याचे निदान २०१७ साली झाले होते. त्यानंतर त्याच्यावर इलाज सुरु करण्यात आला. त्याच्या परिस्थितीत फरक पडत नसल्याने त्याच्या आईने एका मंदिरातील पुजाऱ्याची भेट घेतली. विशिष्ट मंत्रसिद्धीने तिचा मुलगा बरा होऊ शकतो असे आश्वासन त्याने महिलेला दिले. मुळच्या उज्जैनच्या असलेल्या पुजाऱ्याने महिलेच्या घरी जाऊन यज्ञ केला. यज्ञ सुरु केल्यावर महिलेचा मुलगा आणि महिलेला त्याने पवित्र राख प्राशन करण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने दोघेही शुद्धीवर आले. पुजारी घरातच होता. मुलाचा आजार बरा करावा म्हणून मी हे केले. तुमचा मुलगा लवकरच बरा होईल. असे सांगितले. त्यानंतर तिच्याकडून ६० हजार रुपयांचे दागिने घेऊन तो निघून गेला.

काही दिवसांनी पुजाऱ्याने महिलेशी संपर्क केला. तिला अंधेरीतील घरी बोलवून घेतले. महिला घरी गेली तेव्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हा कर्मकांडाचा भाग आहे असे सांगितले. त्याने महिलेसोबतच्या कृत्याचे व्हीडीओ चित्रिकरण केले. व फोटो काढले. त्याआधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलगा बरा करण्याच्या विधीसाठी त्याने महिलेच्या पतीकडून २ लाख ९८ हजार रुपयेही उकळले. मुलाच्या मृत्यूनंतरही त्याने पैसे उकळणे सुरुच ठेवले. हा सर्व त्रास सहन न झाल्याने पिडीत महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. दोघांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बलात्कार, खंडणी, धमकावणे, जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us