‘LoC’वर सैनिकांच्या ‘जबरदस्त’ प्रत्युत्‍तरानंतर ‘पाक’मध्ये ‘खळबळ’, PM इम्रान खाननं बोलावली तात्काळ ‘NSC’ची बैठक

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – दहशतवाद्यांविरोधात भारताने कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पाकिस्तान चांगलेच हादरले आहे. नियंत्रण रेषेवर ‘क्लस्टर बॉम्ब हल्ला’ केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर भारताने पाकिस्तानने केलेल्या आरोपाचे खंडण केले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आज इस्लामाबादध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा समिती’ (NSC) ची बैठक बोलावली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत देशाच्या सुरक्षा आणि सद्य परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. तसेच देशांतर्गत आणि बाहेरील हल्ल्यांविषयी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबरोबच घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाने दहशतवादविरोधात ठोस पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय सुरक्षा दलाकडून सुरु असलेल्या कारवाईला पाकिस्तान घाबरला असून पाकिस्तानने रविवारी नियंत्रण रेषेजवळील पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे नियंत्रण रेषेवर गोळीबारी सुरु असून भारतीय सैनिकांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान जम्मू काश्मिर मधील केरन सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी शनिवारी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सिमा कृती दलातील ५ ते ७ जणांना कंठस्नान घातले आहे.

दरम्यान भारतीय सेनेने ठार केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जाण्यास पाकिस्तानला सांगितले आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह सीमा रेषेवर पडून असून ते घेऊन जावेत असे भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला सांगितले आहे. तसेच हे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानी सेनेने पांढऱ्या रंगाचा झेंडा घेऊन भारतीय सीमा रेषेवर येण्यास सांगितले आहे. मात्र, अद्याप पाकिस्तानकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त