इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचे 99 व्या वर्षी निधन

लंडन : वृत्तसंस्था –   जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याला धक्का देणारी बातमी लंडनमधून आली आहे. ब्रिटीश राजघराण्यातले वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप (वय 99) यांचे शुक्रवारी (दि. 9) सकाळी निधन झाले आहे. फिलीप गेल्या काही दिवसांपासून जुन्या हृदयरोगाच्या तक्रारीसाठी रुग्णालयात उपचार घेत होते. विंडसर पॅलेस इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फिलीप यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

बकिंगहम पॅलेसकडून अधिकृतपणे राणी एलिझाबेथ यांच्या वतीने निधनाविषयी कळवण्यात आले आहे. 1947 मध्ये म्हणजे राजकुमारी एलिझाबेथ महाराणी व्हायच्या अगोदर 5 वर्षं त्यांचा फिलीप यांच्याशी विवाह झाला होता. ब्रिटीश घराणेशाहीच्या इतिहासात एका सम्राज्ञीबरोबर 70 वर्षांहून अधिक काळ त्यांनी संसार केला आणि त्यासाठीच त्यांना ओळखले जाते. ब्रिटीश राजघराण्यात 70 वर्षं ड्युकपदावर राहिलेले फिलीप हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला ते ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत होते. फिलीप प्रथमपासून रूढीवादाला फाटा देणारे म्हणून ओळखले गेले. राजघराण्यात असूनही त्यांनी काही प्रथांना उघड विरोध केला होता. त्यांनी ब्रिटीश राजवाड्यात आधुनिकता आणली होती. आता पुढचा महिनाभर ब्रिटीश राजघराण्यात दुखवटा पाळला जाणार असून त्यानंतर महाराणी एलिझाबेथ रॉयल ड्युटी सांभाळायला पुन्हा सज्ज होतील.