Coronavirus : IRCTC ने ‘या’ खासगी गाड्यांचे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद केले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासगी रेल्वे गाड्यांचे बुकिंग बंद करण्यात करण्यात आले आहे. खासगी ट्रेनचे कामकाज पाहणारी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान खासगी ट्रेनचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाड्यांचे बुकिंग पुन्हा बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

यामुळे बुकिंग बंद
आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप मल्ल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, खासगी गाड्यांमध्ये बुकिंग चे नाहीतर मनुष्यबळाची समस्या आहे. म्हणून खासगी गाड्यांचे बुकिंग थांबवण्यात आले आहे.

देशात दोन खासगी गाड्या
देशामध्ये सध्या दोनच खासगी गाड्या धावता आहेत. यामध्ये तेजस एक्सप्रेसच्या नावाने देशातील अति व्यस्त मार्गावर या गाड्या धावतात. यात दिल्ली ते लखनौ आणि अहमदाबाद ते मुंबई या मार्गाचा समावेश आहे.

बुकिंगची रक्कम रिफंड
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्यांनी तेजस एक्सप्रेमध्ये 15 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान बुकिंग केले आहे. अशा प्रवाशांना त्यांची बुकिंगची रक्कम रिफंड केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवासांचा लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर देशातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे खासगी गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 15 एप्रिलपासून देशातील लॉकडाऊन हटवला जाईल अशी चर्चा होती. मात्र देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढवण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.