कोरेगाव भीमा शौर्यदिन : 530 व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला नोटीसा, 77 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोरेगाव भीमा/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिरुर हवेलीमधील यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या 77 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कार्यवाहीचे आदेश प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. तर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाईच्या नोटिसादेखील या परिसरातील व्हॉट्सअप ॲडमिनला पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. शिरुर-हवेलीतील 530 व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला नोटिसा देण्यात आल्या आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार अभिवादन कार्यक्रम परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या 77 जणांना 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 सकाळी सहा पर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास, वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

तर व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनवर होणार कारवाई
कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष दिले जात आहे. यासाठी परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपवर समाज विघातक, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, व्हिडीओ पोस्ट टाकून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ग्रुपवरही पोलिसांचे लक्ष असून संबंधित ॲडमिनवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

530 ग्रुप ॲडमिनला नोटिसा
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 120 ग्रुप तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 410 ग्रुप ॲडमिनला पोलिसांकडून लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. ग्रुप ॲडमिनने आपल्या ग्रुपवर लक्ष ठेवण्यासह योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधित ॲडमिनला देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली.

ग्रुप ॲडमिनवर अटकेची कारवाई होणार
ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप ॲडमिनलाच जबाबदार धरून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. यामुळे ग्रुप ॲडमिन यांनी सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. शक्यतो ग्रुप ॲडमिन यांनी आपल्या ग्रुपची सेटींग बदलून पोस्टचे नियंत्रण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.