पुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी ! ‘कोरोना’ग्रस्त मातांची 109 अर्भकं कोरोनामुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाबाधित गर्भवती महिलेकडून जन्माला येणाऱ्या नवजात बालकाला कोरोनाची बाधा होऊ नये व बाळ आणि बाळंतीन दोघंही घरी जाताना कोरोनामुक्त होऊनच परतावे या ध्येयानं कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेच्या सोनावणे प्रसुतिगृह येथून मे महिन्यापासून तब्बल 109 कोरोनाबाधित महिल्यांच्या प्रसुती झाल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले आहेत.

कोरोनाबाधित महिलांच्या प्रसुतीसाठी महापालिकेचे राज्य शासनाच्या सचूनेनुसार, 2 मे पासून भवानी पेठेतील सोनावणे प्रसुतिगृह कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या सेवेत रूजू झाले आहे. कोरोनाबाधित गर्भवती महिला कोरोनामुक्त करणं, तसंच तिच्यापासून नवजात बालकाला कुठल्याही प्रकारे संसर्ग होऊ नये याची विशेष खबरदारी प्रसुतिगृहात घेण्यात येत आहे. कोरोनाबधित गर्भवतीच्या प्रसुतिनंतर पुढील 5 दिवस ते नवजात बालक आईकडे न देता ते अन्य नातेवाईकांकडे सुपूर्त केले जाते. यामुळं स्तनपान करताना बाळाला कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जाते.

5 दिवसांनंतर बाळाची कोरोना चाचणी केली जाते. आतापर्यंत 107 शिशुंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचं आढळून आलं आहे. संबंधित शिशुंना जन्मत:च सर्व उपचार देताना त्यांचं पोषणही व्यवस्थित होईल यासाठी संबंधित शिशुच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना देण्यासोबतच सातत्यानं त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी करण्यातही हे प्रसुतिगृह मागे नाही. परिणामी आजपर्यंत इथं झालेल्या 108 प्रसुतींपैकी 85 सिझर आणि 21 नॉर्मल आहेत. असं असलं तरी बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊनच घरी परतले आहेत.

सदर प्रसुतिगृहात 108 प्रसुति झाल्या असून केवळ 2 शिशुंनाच कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. पंरतु ही बाधाही शिशुच्या आईकडून नव्हे तर त्याचा सांभाळ करणाऱ्या अन्य नातेवाईकांच्या मार्फत झाल्याचं दिसून आलं आहे. संबंधित नातेवाईक हे कोरोनामुक्त होते परंतु ते कोरोनाचे वाहक बनल्यानं त्यांच्यापासून ही लागण शिशुंनाही झाली. इतर प्रसुतिगृहातून 2 बालकं इथं कोविड 19 च्या उपचारासाठी दाखल झाली होती. अशी चारही नवजात बालकं अकरा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहेत.

मे महिन्यापासून आतापर्यंत 109 प्रसुती सोनावणे प्रसुतिगृहात झाल्या आहेत. सर्व बाळ-बाळंतीन सुखरूप व कोरोनामुक्त असल्याची माहिती प्रसुतिगृहाच्या प्रमुख डॉ माधुरी रोकडे यांनी दिली आहे.