बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ‘पबजी टुर्नामेंट’चं आयोजन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- सध्या पबजी (PUBG) या मोबाईलवरील गेमने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. अनेकजण हा गेम खेळतांना दिसतात. आपल्या मुलांना या गेमच्या विळख्यातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी पालक प्रयत्न करत असतांना शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चक्क ‘पबजी टुर्नामेंट’चे आयोजन केले आहे.

२३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती आहे, आणि त्यांच्या जयंतीनिमित्त  शिवसेनेतर्फे दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रायगडमधल्या रोहा तालुक्यात युवासेनेतर्फे पबजी टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. याचं डिजीटल पोस्टर बनवण्यात आलं असून त्याच्यावर बाळासाहेबांच्या फोटोसह ‘बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन’ आणि यानिमित्त ‘रोहा शहरात प्रथमच रोहा तालुका स्तरीय पबजी टुर्नामेंटचे आयोजन’ असा मजकूर लिहीण्यात आला आहे. आजपासून रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालय या ठिकाणी या टुर्नामेंटला सुरूवात देखील झाली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिस आणि चषक दिलं जात आहे.

एकीकडे पबजीवर बंदी घातली नाही तर अनेक मुले नापास होतील, अशी भीती व्यक्त करीत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली असताना तरुणांसाठी घातक ठरत असलेल्या ‘पबजी’ गेमच्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आल्याने विविध क्षेत्रांतून नाराजीचा सूर उमटत आहे.