पुलवामा हल्ल्याचा भारतीय खेळाडूंकडून निषेध

 वृत्तसंस्था – पुलवामात ४४ सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही या घटनेविषयी चीड व्यक्त केली आहे. आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे गौतम गंभीरने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

‘हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली. श्रीनगर-जम्मू हायवेवर 18 (ट्वीट करतानाचा आकडा) सीआरपीएफ जवान आयईडी स्फोटात शहीद’ असं ट्वीट गौतम गंभीरने केलं.

दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. .

गंभीरप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केला आहे. ‘जम्मू काश्मिरमध्ये आपल्या झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले सीआरपीएफचे शूर जवान धारातीर्थी पडले आहेत. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. जखमींची प्रकृती सुधारावी यासाठी शुभेच्छा’ अशा भावना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केल्या आहेत. याशिवाय क्रिकेट पटू सुरेश रैना, शिखर धवन, रिषभ पंत, प्रवीण कुमार,उन्मुक्त चांद, हरभजन सिंह, बॉक्सर विजयेंद्रसिंह, मनॊज कुमार, कुस्तीपटू साक्षी मलिक यांनीही हल्ल्याचा निषेध करत जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.