‘त्या’ शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी गर्भवती वीरपत्नी बेशुद्ध

जयपुर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर सोमवारीही दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलिना परिसरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दल यांच्यात  तब्बल १६ तास चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह ४ जवान आणि एक पोलीस शहीद झाला आहे. त्यामध्ये  शहीद जवानांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल शेवोराम, शिपाई अजय कुमार आणि हरी सिंह यांचा समावेश होता.

तसेच यातील राजस्थानमधील हेड कॉन्स्टेबल शेवोराम यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यावेळी आपल्या वीरपतीला अखेरचा निरोप देताना त्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध झाली. ही वीरपत्नी नऊ महिन्याची गर्भवती असून त्यांची प्रसुतीची तारीख जवळ आहे. मंगळवारी या वीरपत्नीला तिचे पती शहीद झाल्याची बातमी कळाली. या बातमीनंतरही स्वत:ला सावरत त्या खंबीरपणे उभ्या होत्या. पण अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या भावनाचा बांधा फुटला आणि त्या चक्कर येवून जागेवरच कोसळल्या आहेत.

त्यानंतर या वीरपत्नीला तत्काळ स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना जयपूरच्या रूग्णालयात दाखल करण्याचे सांगितले. त्यांची नाजूक परिस्थिती पाहता डॉक्टरांनी त्यांची लवकरात लवकर प्रसुती करण्याचे सांगितले. शहीद शेवोराम हे गेल्या १६ वर्षापासून देशसेवेत आपली सेवा बजावत होते. ४० वर्षाच्या शहीद शेवोराम यांना एक चार वर्षाचा मुलगा देखील आहे. तर त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे.