पुणे पोलीस दलातील आणखी 2 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण, 12 जणांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वाराटाईन करण्यात आले होते. त्यातील दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान होम क्वाराटाईन करण्यात आलेल्या 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस, पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करत आहेत. संचारबंदी लागूकरत घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याकाळात पोलीस अश्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करत आहेत.

दरम्यान फरासखाना पोलीस ठाण्यातील कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यास व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हा कर्मचारी वाहन चालक होता. त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या फरासखाना पोलीस ठाण्यातील 14 जणांना होम क्वाराटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पोलीस दलातील एकूण तिघे कोरोना बाधित झाले आहेत.
आज रिपोर्ट आलेले दोघे कर्मचारी पहिल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात होते. ते एकाच चौकीला होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे या दोघांच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस ठाणे आणि परिसरात निर्जुतिकरण फवारणी करण्यात येणार आहे. यातील एकजण शिवाजीनगर परिसरात राहण्यास असून दुसरा कर्मचारी सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहण्यास आहे. आता या परिसरात देखील जवळचा सील करण्यात येणार आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती काढली जाणार आहे. त्यांचे देखील विलगीकरणं करण्यात येणार आहे.

पोलिसांची नियमित आरोग्य तपासणी, त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कामावरुन घरी पोहचल्यानंतर पोलिसांनी घ्यावयाची काळजी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.पोलिसांचे आरोग्य तसेच समस्या सोडविण्यासाठी पोलीस मुख्यालयातील उपायुक्त वीरेंद्र मिश्र आणि त्यांचे पथक काम करत आहेत.प्रशासनाकडून पोलिसांचे आरोग्याबाबत काळजी घेण्यात येत आहे.त्यामुळे कर्मचाºयांनी काळजी बाळगू नये. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे आधिकारी आणि कर्मचाºयांच्या पाठीशी संपूर्ण पोलीस दल आहे.

– डॉ.के.वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे