पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध शूज व्यावसायिक चंदन शेवानी खून प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध शूज व्यावसायिक चंदन शेवानी (वय 48) खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. यापुर्वी दोघांना पकडण्यात आले होते. शेवानी यांचे अपहरण केल्यानंतर सातारा जिल्ह्यात नेऊन त्यांची निर्घृन खून करण्यात आला होता.

अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय 21, रा. ब्राम्हण आळी, सासवड, मुळ रा. हिरडोशी, ता. भोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मागील महिन्यात (जानेवारी) शेवानी यांचे रात्री मालधक्का चौकातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सातार्‍यातील पाडेगाव नजीक गोळी झाडून तसेच वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आफ्रिदी रौफ खान (वय 23, रा. नाना पेठ) याला पकडले होते. त्यानंतर गायकवाड याला अटक केली होती.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी परवेझ शेख आणि प्रितम अंब्रे फरार आहेत. दरम्यान, धुमाळ हा खुन झाल्याच्या ठिकाणी हजर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो प्रितम अंब्रेचा मेव्हणा असल्याचे तपासात उघड झाले आहे. अजिंक्य धुमाळ स्वारगेट एसटी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक जगताप, सहायक निरीक्षक जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.