दुर्दैवी ! पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, 6 वर्षाच्या मुलाला आणि 3 वर्षाच्या चिमुकलीला गळफास देऊन आई-वडिलाची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. प्रथम दोन चिमुकल्यांना गळफास दिल्यानंतर आई-वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी कुटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. यात 6 वर्षाच्या मुलाचा आणि 3 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबिय येथील सुखसागर नगर गल्ली नं. 1 अहिरन्त इमारतीत राहत होते. दरम्यान, अतुल हे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आयकार्ड बनविण्याचे काम करत असत. त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती.

प्रेम विवाह असल्याने अतुल यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. ते त्यांना बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान ते त्यांच्या बालपणीच्या मित्राकडे भाड्याच्या खोलीत राहत होते.

गुरुवारी दिवसभर दरवाजा उघडला नाही. यामुळे घरमालक म्हणजे त्यांचा मित्र शशी यांनी दार वाजवले. पण दार उघडले नाही. त्यांनी पाहिले असता त्यांना संशय आला. त्यांनी रात्री 11 वाजता पोलिसांना फोनकरून याची माहिती दिली. त्यावेळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शलवरील कर्मचारी श्रीकृष्ण खोकले व रणजित काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना चौघेही एकाच अँगलला गळफास लावून घेतलेल्या आढळून आले. हे चित्र पाहून त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. त्यांनतर पोलीस नाईक ललित मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह खाली काढून ते ससून रुग्णालयात नेले. हा प्रकार समजल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

दोन मुलांना आधी…

माता-पित्यांनी आधी 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाच्या मुलीला फासावर चढविले. त्यांनतर त्या दोघांनी गळफास लावून घेतला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांकडून याचा तपास सुरू असून, दोन खून आणि आत्महत्या केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

चित्र पाहून अंगावर शहारे उभारले

पोलिसांनी दार तोडल्यानंतर खोलीतील एकाच अँगलला लाईन चौघेही गळफास घेतलेल्या दिसून आले. त्यावेळी पाहणाऱ्या पोलीस आणि घरमालक यांच्या अंगावर शहारे उभा राहीले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.