Pune : पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या बापाला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या पित्यास न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोने यांनी ही शिक्षा सुनावली. मुलीला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने पहिल्यांदा मुलीवर केलेला अत्याचार पत्नीला कोणाला सांगितला नव्हता. मात्र दुस-या वेळी पत्नीने फिर्याद दिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्हेगार हा मोटार चालक म्हणून काम करीत. तो २०१७ मध्ये पिंपळे गुरव येथे पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह राहावयास आला होता. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडेचार वाजता तो दारू पिऊन घरी आला. आरोपीने मुलीस तू अंगणवाडीत का गेली नाही? अशी विचारणा करीत मारहाण करू लागला. त्यामुळे फिर्यादीने त्याला अडविले असता पतीने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी घरातील स्वच्छतागृहात गेल्या असता मुलगी रडत असल्याचा आवाज त्यांना आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता पती मुलीवर बलात्कार करीत असल्याचे दिसले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला त्वरित बाजूला घेत शिवीगाळ केली.

फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली. पोलिस उपनिरीक्षक मधुमती शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. खटल्यात सात जणांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी, ॲड. देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले.

पत्नी व मुलीला दिली जीवे मारण्याची धमकी :

या प्रकाराबाबत कोणास काही सांगू नको. तसेच मुलीला दवाखान्यात घेऊन जायचे नाही, असे बोलून आरोपीने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यानंतर गुन्हेगाराने पुन्हा सहा डिसेंबर रोजी फिर्यादीला मारहाण करीत मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.